पाटण : रस्त्यावर आडवी उभी केलेल्या कारमधून उतरलेल्या चौघांनी जीपमधील दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील एक लाख ३0 हजार रुपये हिसकावून घेतले. हा थरारक प्रकार कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव हद्दीत शुक्रवारी रात्री घडला. घटनेनंतर चारही लुटारूंनी पाटणच्या दिशेने पलायन केले. कोयना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहत असलेले अकबर खाटिक (वय ३६) हे जीपमधून (एमएच ५०-५१९६) दापोलीला बकरी विक्रीसाठी गेले होते. बकरी विकून परत येत असताना शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील वाजेगाव हद्दीत एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. या कारमधून अचानक चारजण खाली उतरले. त्यातील एकाने रिव्हॉल्व्हर काढून अकबर खाटिक व चालक रफिक महंमद शेख (वय ४२, रा. सातारा) यांच्यावर रोखली. तसेच ‘कॅश कोठे आहे?,’ असे विचारत दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अकबर खाटिक यांच्या बंडीच्या खिशात असलेली एक लाख ३० हजारांची रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी पाटणच्या दिशेने पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेशचंद्र कलासागर, पोलिस उपअधीक्षक नीता पाडवी, सहायक पोलीस निरीक्षक उत्तम वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. जीपच्या चाकाजवळ आढळले जिवंत काडतूस अकबर खाटिक व चालक यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून मारहाण करण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरमधील एक जिवंत काडतूस खाली पडले. ते जीपच्या चाकाजवळ पोलिसांना सापडले. दरोड्याचा हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कट असावा, असा संशय पोलिस व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
रिव्हॉल्व्हरच्या धाकाने सव्वा लाख लुटले
By admin | Updated: April 17, 2016 00:34 IST