वाई : वाई नगरपालिकेत नगरसेवकांना विश्वासात न घेता बेकायदेशीर लाखोंचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक अनिल सावंत यांनी केली आहे. सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक असणाऱ्या सावंत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नगरपालिकेच्या कारभाराविषयी अनेक गंभीर आक्षेप घेतले आहेत. ते म्हणाले, ‘वाई नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या उपस्थितीत दि़ २३ डिसेंबर २०१४ रोजी झाली. त्यावेळी पत्रिकेवर ३१ विषय होते़ सभेमध्ये या विषयांवरती चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी २० फेबु्रवारी २०१५ रोजी २३ डिसेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आयत्या वेळच्या विषयाला अनुसरून ठराव क्रंमाक ४० व ४१ यावर अनुमोदक म्हणून सही घेण्यासाठी नगरपालिकेचा कर्मचारी माझ्याकडे आला. त्यावेळी २३ डिसेंबर रोजी झालेल्या विशेष सर्वसाधरण सभेमध्ये एकूण १५ विषयांना आयत्या वेळीचे विषय इतिवृत्तात घुसवून मंजुरी दिल्याचे निर्दशनास आले़ त्याबाबत तक्रार करून ही गंभीर बाब मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस काढून गैर प्रकाराबाबत कार्यवाही केल्याचे चित्र रंगविण्यात आले. वाढविलेल्या १५ विषयांवर मुख्याधिकारी यांनी अनाधिकारने व स्वमर्जीने सहीनिशी मान्यता दिलेली आहे, असे निदर्शनास आले आहे. मंजुरी दिलेल्या आयत्या वेळच्या विषयांमध्ये लाखोंची उलाढाल होत असल्याचाही आरोप सावंत यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवकांना विश्वासात न घेता ठराव
By admin | Updated: April 14, 2015 00:40 IST