सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असणाऱ्याºपावसाचा जोर मंदावला असून, कोयनेला २१, नवजा येथे २६ तर महाबळेश्वरला २७ मिलीमीटरची नोंद झाली. तर महाबळेश्वरच्या पावसाने या वर्षातील एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणातील पाणीसाठा ४० टीएमसीवर गेला होता.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून माॅन्सूनचा पाऊस पडत आहे. विशेष करुन पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात पावसाचे प्रमाण अधिक राहिले. मागील मंगळवारपासून पावसाचा जोर होता. मात्र, गुरूवारी सायंकाळपासून पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. बामणोली, तापोळा, कोयना आणि महाबळेश्वरमध्ये तुफान वृष्टी झाली. यामुळे ओढे, ओघळ भरून वाहिले. तसेच छोटे तलावही भरुन वाहू लागले आहेत. त्याचबरोबर पश्चिम भागातील प्रमुख धरण परिसरातही जोरदार पाऊस झाला. यामुळे धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
कोयना धरणात मागील आठ दिवसांत १० टीएमसीहून अधिक पाणी आले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयनेत ४०.६८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर १६५७६ क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. त्याचबरोबर कोयनेला सोमवारी सकाळपर्यंत २१ तर या वर्षी जूनपासून ७९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे २६ व या वर्षी ८९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच महाबळेश्वरला सोमवारी सकाळपर्यंत २७ तर यावर्षी आतापर्यंत ९९९ मिलीमीटर पाऊस झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास महाबळेश्वरच्या पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. त्याचबरोबर पश्चिम भागातील तारळी, कण्हेर, धोम, बलकवडी, उरमोडी या धरणांमध्ये पाणी आवक होत असल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही माॅन्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला नाही. काही भागांत चांगली हजेरी लावली. तेथे खरीप हंगामातील पेरण्या सुरू आहेत. पण, अजूनही पेरण्यांना वेग आलेला नाही. पेरण्या पूर्ण होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच अजूनही अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करण्याची तयारी दर्शविलेली नाही. सध्या पूर्व भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
चौकट :
चार दिवसांपासून विसर्ग...
कोयना धरणात मागील आठवड्यांत ३० टीएमसीच्या खाली पाणीसाठा होता. सध्या ४० टीएमसीवर गेला आहे. कोयनेच्या पायथा वीजगृहातून १८ जूनपासून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी नंतर कोयना नदीपात्रात जाते.