शिवडे येथे कृष्णा नदीवर असलेल्या पुलाला अतिवृष्टीचा फटका बसला होता. अतिवृष्टीमध्ये हा पूल दोन दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे लोखंडी रेलिंगला मोठी झाडे अडकल्याने पुलाचे काही ठिकाणचे रेलिंग वाहून गेले होते, तर काही ठिकाणी रेलिंगची मोडतोड झाली होती. तसेच या पुलाचा उंब्रज बाजूचा भरावही वाहून गेला होता. पुलानजीक उंब्रज व मसूर बाजूला रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. बांधकाम विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुलावरील स्वच्छता व पुलाचे रेलिंग वाहून गेलेल्या ठिकाणी लाल रंगाच्या आडव्या पट्ट्या बांधल्या. मात्र, गत दीड महिन्यापासून दुरुस्तीचे काम हाती घेतले नव्हते. परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या पुलावरून रहदारी करताना प्रवाशांसह वाहनचालकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. सध्या बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, भराव करण्याची मागणीही वाहनधारकांकडून केली जात आहे.
- चौकट
प्रवास बनला निर्धाेक
शिवडेतील पुलावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, मात्र अतिवृष्टीत रेलिंग वाहून गेल्यामुळे या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली होती. रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांमध्येही भीतीचे वातावरण होते. अखेर बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे पुलावरील वाहतूक निर्धाेक झाली आहे.