पेट्री : सातारा - कास मार्गावरील देवकल फाट्यावर रविवारी सकाळी झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाकडून रस्त्यावरील झाड तातडीने हटविण्यात आले. वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
सातारा शहराच्या पश्चिमेस गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवस पावसाने थोडीफार विश्रांती घेतली असली तरी पावसाची रिमझिम सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी सातारा - कास मार्गावरील मुख्य रस्त्याच्या मधोमध झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. एकाच वेळी दोन वाहने या ठिकाणाहून ये - जा करू शकत नसल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होत होती.
या ठिकाणी धोकादायक वळण असून, रात्री रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडलेल्या झाडाचा अंदाज न आल्यास एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परिसरात दिवसादेखील दाट धुके असल्याने या परिस्थितीचा अंदाज न आल्यास एखादा मोठा अपघात होण्याचा संभव अधिक होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाकडून रस्त्यावरील झाड हटवून हा मार्ग वाहतुकीस मोकळा केला.
फोटो : २२ सागर चव्हाण
सातारा - कास मार्गावर असलेल्या देवकल फाट्याजवळ रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यात आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. (छाया : सागर चव्हाण)