वाई : खवल्या मांजरप्रकरणात आरोपींनी जामिनासाठी केलेले अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे त्यांची सातारा येथील वनकोठडीत रवानगी करण्यात आली.
दिलीप मोहिते (वय ५०), मयूर केंजळे, अक्षय मोहिते (२३ तिघेही रा. पिंपोडे बु. ता. कोरेगाव), वसंत सपकाळ (५० रा. धावडी ), भिकाजी सूर्यवंशी (३४ रा. बालेघर ) प्रकाश शिंदे ( ४४ शिरगाव ता. वाई) व सुशांत शेलार (रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
वाईजवळ सुरुर रस्त्यावर वन विभागाने सापळा लावून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या सात जणांना अटक केली होती. विक्रीसाठी आणलेल्या दुर्मीळ खवल्या मांजरासह एक जीप, दुचाकी व पाच मोबाईल जप्त करण्यात आले होते. मुद्देमालासह अंदाजे ११ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला होता. न्यायालयाने या सात जणांची वनकोठडीत रवानगी केली होती. या गुन्ह्याप्रकरणी सरकारी वकील मिलिंद पांडकर यांनी केलेला युक्तिवाद तसेच सहायक वनरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे व परिविक्षाधीन गणेश महांगडे यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून आरोपींनी जामिनासाठी केलेले अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी फेटाळून लावला. त्यांची सातारा येथील वनकोठडीत रवानगी केली. यासंदर्भात वाई आणि कोरेगाव या तालुक्यांचा संदर्भ आल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते, तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे अर्ज फेटाळल्याने धाबे दणाणले आहेत, आरोपींकडे सापडलेले खवले मांजर अधिवासात सोडण्यात आले.