मसूर : रिसवड (ता. कऱ्हाड) येथे एक महिन्यापासून भटक्या श्वानांनी हल्ला करून चार रेडके ठार, तर एक रेडकू जखमी केले. पोल्ट्री फार्ममधील सोळा कोंबडया व दोन बदके फस्त करून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या महिन्यापासून पांडुरंग रघुनाथ इंगवले, संपत गणपती इंगवले, सतीश दिनकर इंगवले, अविनाश इंगवले या शेतकऱ्यांची रेडके शेतातील गोठ्यात जाऊन हल्ला करून ठार केली आहेत. तर जयवंत दादा इंगवले यांचे रेडकू हल्ला करून जखमी केले. तसेच राजाराम दादा इंगवले यांच्या सोळा कोंबड्या, दोन बदके श्वानांनी हल्ला करून फस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
या परिसरात दहा ते बारा भटक्या श्वानांचे टोळके आहे. हे टोळके शेतामध्ये दिवसासुध्दा एकटा माणूस दिसला तर त्याच्यावर हल्ला करते. त्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. महिला श्वानांच्या धास्तीने शेतात जायला धजावत नाहीत. शेतकऱ्यांची रोजी रोटी शेतीवर अवलंबून असते. तसेच खरीप पिकांची आंतरमशागतीची कामे करण्यासाठी शेतात गेल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु या श्वानांनी रेडके, माणसे यांच्यावर हल्ला करण्याचा सपाटा लावल्याने शेतकरी, महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. तरी संबंधित विभागाने पाहणी करून श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कोट-
गत महिन्यापासून गावातील शेतकरी, महिला श्वानांच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जायचे का श्वानांच्या भीतीने घरातच बसायचे, याचा विचार करून शासनाने याचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.
- सतीश इंगवले,
माजी सरपंच, रिसवड