सातारा : वर्षानुवर्ष पालिकेची थकबाकी ठेवणाऱ्यांची नावे फ्लेक्सवर लावण्यासाठी पालिका मुहूर्त शोधत आहे की मने दुखवतील, याची काळजी घेत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कऱ्हाड पालिकेने थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर लावल्यानंतर झपाट्याने वसुली झाली. मात्र सातारा पालिकेला कडक धोरण अवलंबता येत नसल्यामुळे पालिका स्वत:चेच नुकसान करत असल्याचा आरोप होत आहे.यंदा थकबाकरीदारांच्या विरोधात धडक मोहीम राबवून शंभर टक्के वसुली करायची, या हेतूने पालिकेची वसुली मोहीम सुरू झाली. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून थकबाकीदारांना तंबीवजा इशारा देण्यात आला. लाऊड स्पीकरवरही थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात येतील. तसेच फ्लेक्स लावूनही अशा लोकांची नावे जाहीर करण्यात येतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र यातील कोणताच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे पालिकेच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरवर्षी वसुली मोहीम सुरू झाली की नगरसेवकांचा हस्तक्षेप नित्याचाच असतो. हे वसुली मोहिमेतील अधिकाऱ्यांना माहीत असल्यामुळे हे अधिकारीही मग जेवढी जमेल तेवढी वसुली करतात. यामध्ये अधिकाऱ्यांचे नुकसान होत नसून पालिकेलाच याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. केवळ सर्वसामान्यांना धाक दाखवून त्यांच्याकडून वसुली करून घेणे गरजेचे नसून धनधांडग्यांनाही याची जरब बसली पाहिजे, यासाठी पालिकेने इतर पालिकांसारखी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही होत आहे.थकबाकीदारांची फ्लेक्सवर नावे झळकल्यास वसुली मोहिमेतील अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीपोटीही फ्लेक्स नावे लावण्यास टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)वसुलीचे उद्दिष्ट होणार का साध्य !थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी पालिकेने कचखाऊ भूमिका घेतल्याने वसुलीचे ठरलेले उद्दिष्ट साध्य होणार का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शंभर टक्के वसुली झाल्यास नगरसेवकांनाही विकासकामांसाठी निधी वाढवून मिळणार आहे. मात्र या वसुली मोहिमेलाच खीळ बसत असल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
थकबाकीदारांच्या फ्लेक्ससाठी हवाय मुहूर्त
By admin | Updated: March 9, 2016 01:12 IST