कोरेगाव : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्ष वाढविणे ही माझी जबाबदारी आहे; त्यामुळे मी कोणाला आव्हान देत नाही. मी फक्त माझे काम करीत आहे. पक्षवाढ करणे हाच माझा अजेंडा असल्याने मी कोणाच्याही आव्हानांना घाबरत नाही. कोणीही कोणतेही आव्हान देऊ द्या, ते मी स्वीकारत आहे,’ अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नामोल्लेख न करता त्यांचा समाचार घेतला.
एकंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव महाडिक, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, सदस्या सुप्रिया सावंत, पक्षाचे विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कार्याध्यक्ष श्रीमंत झांजुर्णे, रमेश उबाळे उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘मी विकासकामांद्वारे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो. आजवर विकासकामे करीत आलो आहे. भविष्यातही करणारच आहे. त्यामुळे मी कोठे जाणार हा आता प्रश्न उरला नाही. मी कोरेगावातच आहे आणि कोरेगावातच थांबणार आहे. विधान परिषद सदस्य असल्याने संपूर्ण राज्य हेच माझे कार्यक्षेत्र आहे. २८८ मतदारसंघांमध्ये मी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहे. पक्षवाढीसाठी मी कोठेही फिरणार; त्यामुळे कोणीतरी आव्हान देत असेल तर मी ते स्वीकारणारच आहे. त्यात कोठे कमी पडणार नाही. कोरेगाव मतदारसंघातील परिस्थिती ‘आधे इधर, आधे उधर,’ अशी आहे. कामाच्या वेळेला शिवसेना आणि बाकीच्या वेळेला भाजप असे चित्र आहे. आम्ही मात्र कधीही दुहेरी भूमिका घेतली नाही. आमच्या पोस्टरवर पक्षाचे चिन्ह आहे. त्यांच्या पोस्टरवर पक्षाचे चिन्ह आहे काय? जनतेने आता ओळखले आहे.’
यावेळी शिवाजीराव महाडिक, रमेश उबाळे, व्ही. टी. चव्हाण व सतीश कर्णे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शहाजीराव बर्गे, तानाजीराव मदने, भगवानराव जाधव, पी. सी. भोसले, प्रतापराव कुमुकले-निकम, डॉ. गणेश होळ, सरपंच शोभा कर्णे, दत्तात्रय कर्णे, गोरख चव्हाण, पी. के. चव्हाण, व्ही. टी. चव्हाण, विजयराव चव्हाण, संजय पिसाळ, अजित बर्गे, राहुल घोरपडे, मधुकर चव्हाण, रूपेश जाधव, रोहित शिंदे, विकास शिंदे उपस्थित होते. दत्तात्रय कर्णे यांनी स्वागत केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. केतन चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो
०७कोरेगाव-सभा
एकंबे येथील सभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी शिवाजीराव महाडिक, राजाभाऊ जगदाळे, अरुण माने, भास्कर कदम, शोभा कर्णे, दत्तात्रय कर्णे उपस्थित होते. (छाया : साहिल शहा)