दीपक देशमुखसातारा : अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावल्याने साताऱ्यातील निर्यातदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य फटका टाळण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजक तसेच निर्यातदारांनी रणनीती आखली आहे. जिल्ह्यातील उत्पादनांसाठी अन्य देशांचा पर्याय स्वीकारून अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यावर आता भर दिला जाणार आहे.सातारा जिल्ह्यात बारा एमआयडीसी असून सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे दीड लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळतो. या औद्योगिक क्षेत्रासह अन्य उत्पादनाद्वारे जिल्ह्यातून २०२४ वर्षात सर्वाधिक निर्यात अमेरिकेत २३४७.७४ कोटी झाली. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती ४३८.०७ कोटी, इटली ३२५.४४ कोटी आणि चीनमध्ये २६०.७१ कोटी झाली. अमेरिकेसह या देशांना जिल्ह्यातून ऑटोमोबाईल पार्ट, गिअर बॉक्स, जनरेटर सेट, साखर, फाैंड्री उत्पादने, गिअर बॉक्स, औषधे, अभियांत्रिकी उत्पादने, मौल्यवान खडे, टेक्स्टाईल कापड होते. तसेच कृषी मालात स्ट्रॉबेरी, डाळिंब, बेबी कॉर्न, भेंडी यांची प्रमुख निर्यात होते. संपूर्ण देशात सातारा जिल्ह्याची निर्यात २.३१ टक्क्यांच्या जवळपास राहिली आहे. प्रत्यक्षात ही आकडेवारी वर्षाला शेकडो कोटींपर्यंत आहे. याबाबत जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधला असता, त्यांनी जिल्ह्यातील एकूण निर्यातीची माहिती संकलित करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतरच अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीत किती घट होईल, याचा अंदाज येणार आहे.अमेरिकन बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्थानिक निर्यातदारांनी युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका यांसारख्या पर्यायी बाजारपेठांचा शोध सुरू केला आहे. याशिवाय मूल्यवर्धन, शासनाकडून सबसिडी, करसवलती, कौशल्य विकास आणि लॉजिस्टिक सुधारणा होण्याची गरज आहे. डिजिटल विक्री व निर्यात बाजारपेठांचे विविधीकरण हा या संकटातून बाहेर पडण्याचा उपाय मानला जात आहे.
अमेरिकेत सर्वाधिक निर्यातजिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात अमेरिकेतच होते. याशिवाय पाश्चात्य देशात जर्मनी, स्पेन, अरब अमिरात, इराण, आशिया खंडातील दक्षिण कोरिया तसेच ऑस्ट्रेलियातही निर्यात होते.
देशातही मोठी बाजारपेठअनेक उत्पादनांना देशातही मोठी बाजारपेठ आहे. व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील समन्वयातूनही ही बाजारपेठ विदेशी ऐवजी देशातील उत्पादनांसाठी उपलब्ध होण्याची गरज आहे. अमेरिकेने टॅरिफ दुप्पट केल्यानंतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी एकत्र येत अमेरिकन उत्पादनांऐवजी देशात बनलेल्या मालाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
टॅरिफमुळे अमेरिकन नागरिकांना याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचाही याला विरोध होईल व टॅरिफबाबत तेथील सरकारला पुनर्विचार करावा लागेल. उद्योजकांनीही पर्यायी बाजारपेठांवर भर देऊन अमेरिकेतील अवलंबित्व कमी केले पाहिजे. - संजोय मोहिते, अध्यक्ष, मास