कुडाळ : जावळी तालुक्यातील महिगाव ग्रामस्थांना स्वस्त धान्य व रॉकेलसाठी शेजारील गावात जावे लागत होते. पंधरा वर्षांपासून लोकांची समस्या होती. गावातील भवानीमाता महिला बचत गटास स्वस्त धान्य व रॉकेल दुकान चालविण्यासाठी मंजुरी मिळाल्याने आता ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे, असे मत जावळीच्या सभापती जयश्री गिरी यांनी व्यक्त केले.
महिगाव येथे महिला बचत गटामार्फत सुरू केलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, महिगावच्या सरपंच दीपाली पवार, उपसरपंच हरिचंद्र पवार, सायगवचे सरपंच बाळासाहेब कांबळे, शामराव सुतार, हरिभाऊ मुकणे, रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भिलारे, भवानी माता महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा पवार, सचिव विद्या पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांच्या हस्ते स्वस्त धान्य व राॅकेल दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
गेली पंधरा वर्षे महिगाव येथील वयोवृध्द लोकांना, माता - भगिनींना रेशनिंग, राॅकेलसाठी दुसऱ्या गावात जावे लागत होते. आता यापुढे रेशनिंग महिगावात मिळणार असल्याने त्यांची पायपीट वाचणार आहे. याकरिता पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, सभापती जयश्री गिरी यांनी विशेष प्रयत्न करून स्वस्त धान्य व राॅकेल दुकानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे महिगाव येथील महिला व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.