नितीन काळेल सातारा : राष्ट्रीय काॅंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्राद्वारे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करीत ही नियुक्ती जाहीर केली. दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे जिल्हाध्यक्षपदातून मुक्त करावे, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडी वाढल्या होत्या. पण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यातील चर्चेतून रणजीतसिंह देशमुख यांचे नाव पुढे आले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम यांनीही त्यांच्या नावाला पाठींबा दिला. त्यामुळे एकमताने देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
रणजितसिंह देशमुख यांनी यापूर्वी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी पुणे येथील आयएलएस विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली आहे. तसेच पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. खटावसारख्या दुष्काळी तालुक्यात हरणाई सहकारी सूतगिरणीची आणि माण तालुक्यात माणदेशी सहकारी सूतगिरणीची यशस्वी उभारणी देशपातळीवर विशेष लौकिक संपादन केला आहे. उच्चविद्या विभूषित, चारित्रसंपन्न, निष्ठावान कार्यकर्त्याची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसजनांतून आनंद व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह राजेंद्र शेलार, अजित पाटील-चिखलीकर, शिवराज मोरे, डॉ. सुरेश जाधव, अल्पना यादव, नरेश देसाई, बाबासाहेब कदम, ॲड. विजयराव कणसे, रफिकशेठ बागवान, अच्युतराव खलाटे, मनोहर शिंदे, प्रताप देशमुख, झाकीर पठाण, एम. के. भोसले, रजनी पवार, जयदीप शिंदे, महेंद्र सूर्यवंशी, नीलम येडगे, विद्या थोरवडे, गीतांजली थोरात, जगन्नाथ कुंभार, अमरजीत कांबळे आदींनी अभिनंद केले.