ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कथित बदनामीप्रकरणी वडूज पोलिसांनी शुक्रवारी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांची फलटण येथील निवासस्थानी चौकशी केली. यावेळी निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चौकशीसाठी पोलीस आल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी बंगल्याबाहेर गर्दी केली होती.
वडूजचे पोलिस निरीक्षक पोलिस पथकासह विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘लक्ष्मी विलास’ निवासस्थानी सकाळी साडेअकरा वाजता दाखल झाले. ही चौकशी दुपारी अडीच वाजता संपली.
मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीप्रकरणी अगोदरच एक महिला, एक पत्रकार आणि अजून एका पक्षाचा कार्यकर्ता यांच्यावर कारवाई करून अटक केली आहे. त्यापैकी माण, खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रभाकर घार्गे हे मागील पंधरा दिवसांपूर्वीच अटकपूर्व जामीन घेऊन वकिलासह आणि कार्यकर्त्यांसह वडूज पोलिस स्टेशन येथे चौकशीला हजर राहिले होते.
त्याचवेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. परंतु, प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे ते चौकशीसाठी गेले नव्हते. ही चौकशी करण्यासाठी शुक्रवारी वडूजचे पोलिस निरीक्षक सोनवणे इतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यासह आले होते. रामराजे यांच्या निवासस्थानी झालेल्या दीर्घ चौकशीनंतर वडूज पोलिस दुपारी तीन वाजता माघारी गेले. फलटणमध्ये या प्रकाराची माहिती मिळताच राजे गटाचे कार्यकर्ते रामराजे यांच्या निवासस्थानी येऊ लागले.