प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: मलाही पोलिसांनी समन्स दिली आहे. 'त्या' प्रकरणात खंडणी देण्यासाठी तुम्ही १ कोटी रुपये कोठून आणले? हा विषय आहे. मलाही त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. मग 'त्या' महिलेशी 'ते' का बोलले? ते नेमके काय बोलले? त्यांचा तिच्याशी काय संबंध? याविषयी त्यांनाही उत्तरे द्यावीच लागणार आहेत. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. रामराजे नाईक- निंबाळकर यांना 'त्या' खंडणी प्रकरणात पोलिसांनी काढलेल्या समन्सबाबत छेडले असता ते बोलत होते.
कराड येथे शनिवारी मंत्री जयकुमार गोरे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र यादव, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री गोरे म्हणाले, लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवा यासाठी जल जीवन मिशन राबवण्यात आले. मात्र ते राबवण्यात अपयश आले ही वस्तुस्थिती आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. आता त्यातील त्रुटी दूर करून त्या कशा मार्गी लावता येतील याला आम्ही प्राधान्य देत आहोत.
भांड्याला भांडे लागणार, आवाज होणार
जिल्ह्यात सुरू असणाऱ्या महापर्यटन महोत्सवाकडे राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील आदींनी पाठ फिरवली आहे? याकडे लक्ष वेधले असता मंत्री गोरे म्हणाले, महायुती एक कुटुंब आहे व कुटुंबात भांड्याला भांडी लागतात. कधी कधी आवाज होतो. पण बाकी त्यात काही नसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस समारोपाला येणार आहेत. कदाचित तुम्हाला सगळे एकत्रित दिसतील.
निकाल लागला की निवडणुका
ग्रामविकासामध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? याबाबत विचारले असता मंत्री गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच घेण्याची इच्छा आहे. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ते रखडले आहे. न्यायालयाचा निकाल लागला किंवा स्थगिती उठली की लगेच निवडणुका घेतल्या जातील. आम्हालाही स्थानिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळावी असे निश्चितच वाटत आहे.
कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मिळेल भाजपची जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. सातारचा अध्यक्ष कधी निश्चित होईल? यावर बोलताना मंत्री गोरे म्हणाले,आम्ही आमची मते कळवली आहेत. निरीक्षक बंद पाकिटातून आमची मते घेऊन गेले आहेत. ते लखोटे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर फोडले जातील. निश्चितच लवकरात लवकर साताऱ्याला चांगला जिल्हाध्यक्ष मिळेल असे सांगणे त्यांनी पसंत केले.