सागर गुजर - सातारा -जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पहिल्याच झटक्यात सात जागा बिनविरोध करून राष्ट्रवादीच्या ‘राम-लक्ष्मण’ जोडीने आपली ताकद दाखवून दिली. पण अखेरच्या क्षणी माणमधून उसळी घेत आमदार जयकुमार गोरे यांनी विजय मिळवित ‘जय हो’चा नारा घुमविला.उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना ऐनवेळी वाऱ्यावर सोडले!शिवाजी भोसलेंचा आरोप : पराभवाबाबत फोडले नेत्यावर खापरसातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी ऐन मोक्याच्या क्षणी ‘यु टर्न’ घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची गोची होऊन बसली. याची खदखद अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे, गुरुवारी मतमोजणीनंतर उदयनराजेंचे निकटवर्तीय शिवाजी भोसले यांनी पराभवानंतर मनातील सल माध्यमांपुढे जाहीरपणे बोलून दाखविली. ‘उदयनराजेंनी ऐनवेळी वाऱ्यावर सोडल्याने माझा पराभव झाला,’ अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करत जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रान उठविले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या संचालकांनी आता थांबून नव्यांना संधी द्यावी, अशी घोषणा केली होती. बारामतीतून निघणाऱ्या बंद खलित्यांच्या निर्णयावरही उदयनराजेंनी आसूड ओढले होते. जिल्ह्यातले निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक निवडणुकीत उदयनराजेंच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी बहुतांश उमेदवारांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादीने अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत उदयनराजेंचा प्रस्ताव मान्य केला नाही. अखेरच्या क्षणी गृहनिर्माण मतदारसंघातील डी. के. पवार यांचा अर्ज मागे घेऊन उदयनराजेंना बिनविरोध केले. मात्र, उदयनराजे समर्थकांचे अर्ज या निवडणुकीत कायम राहिले. शिवाजी भोसले हेही त्यापैकीच एक. भोसले यांनी इतर मागास राखीव मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. निवडणुकीत उदयनराजेंकडून प्रचारामध्ये सहकार्य मिळण्याची अपेक्षा भोसले यांना होती. इतर मागास मतदारसंघात २ हजार ९८ मते वैध ठरली, त्यापैकी केवळ ४0२ मते शिवाजी भोसले यांना मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. (प्रतिनिधी) सुनेत्रा शिंदेंच्या ‘मशाली’वर २७४ शिक्केसातारा : जिल्हा बँक निवडणुकीत कुडाळच्या सुनेत्रा शिंदे यांनी नाही-होय करत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर बँकेत येऊन राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी पॅनेलच्या महिला उमेदवारांना पाठिंबा दिला. पाठिंबा जाहीर केल्याने त्यांनी प्रचारही केला नाही, तरीसुध्दा त्यांना तब्बल २७४ मते मिळाली आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ हे होते. ही मशाल विझण्याऐवजी ती पेटती ठेवण्यासाठीही मधल्या काळात प्रयत्न झाल्याची चर्चा आता जोर धरत आहे.सुनेत्रा शिंदे या जिल्हा बँकेच्या माजी संचालक आहेत. दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे यांचा त्या वारसा पुढे नेत आहेत. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना डावलून सुरेखा पाटील व कांचन साळुंखे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देऊन टाकले. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्यांना मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. मतपत्रिकेवरही ते होते. त्यामुळे २७४ मतदारांनी त्यावर शिक्के मारले. दरम्यान, याच मतदारसंघात ५0 मते बाद झाली आहेत. त्यामुळे सुनेत्रा शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणाऱ्या मतदारांनी आपली नाराजी मतांच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे आता बोलले जात आहे. (प्रतिनिधी) बाळासाहेब पाटलांना स्वत:चेही मत नाहीआमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दादाराजे खर्डेकर यांना पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यानंतरही त्यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिकदृष्ट्या कायम होता, पण त्यांनी स्वत:लाही मत न करता ते दादाराजे खर्डेकरांना केले.बकाजीराव यांना फक्त १0 मतेबँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील यांना ४९ वैध मतांपैकी १0 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी दत्तानाना ढमाळ यांना ३९ मते मिळाली. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर बकाजीरावांनी आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला.माणमध्ये ‘कपबशी’ला तडेमाण सोसायटी मतदारसंघात सदाशिव पोळ यांच्या कपबशी चिन्हाला तडे गेले. यातून जयकुमार गोरे यांचा विजय झाला. आता या पराभवाची कारणमीमांसा करण्यात राष्ट्रवादीचे नेते गुंतले आहेत. काळवंडलेले चेहरे उजळले!काही मतदारसंघांत काय अवस्था होणार? या काळजीने उमेदवारांचे चेहरे काळवंडले होते. विशेषत: राखीव मतदारसंघांतील उमेदवारांच्या येरझाऱ्या सुरु होत्या. निकालानंतर काहींचे चेहरे उजळले तर काहींचे आणखी काळवंडले.निवडणुकीत गटनिहाय फुटले फटाकेजिल्हा बँकेचे निकाल गटनिहाय बाहेर येत होते. संभाव्य विजयाची हमी असणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आधीपासूनच फटाके आणले होते. निकाल बाहेर आला की गटनिहाय फटाके फुटत होते. गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना उचलून घेऊन आनंद व्यक्त केला.
‘राम-लक्ष्मण’ जिंकले; जयाभावही घुसले!
By admin | Updated: May 8, 2015 00:20 IST