वाई : कोंडोली येथील मंदा संपत चोरट (वय ३८) यांचा दि. ७ फेब्रुवारी रोजी गावातील सुखदेव रामचंद्र चोरट याच्या दुचाकीवरून जाताना वाई-मांढरदेव रस्त्यावर कोचळेवाडी येथे अपघात झाला. अपघाताला महिना होऊनही कोणतीही चौकशी न झाल्याने हा अपघात नसून घातपात आहे, असा आरोप करत कोंडोलीसह पश्चिम भागातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खरात यांच्याकडे सुखदेव चोरट याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर पोलिस निरीक्षक रमेश गलांडे हे बाहेरगावी गेले आहेत, ते आल्यानंतरच संबंधित प्रकरणाविषयीची चौकशी केली जाईल, असे स्पष्टीकरण दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांची भेट घेण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिस निरीक्षक गलांड हे बाहेर गावी गेले होते, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)बचत गटाचे कर्ज...संबंधित इसमाने संबंधित महिलेकडून बचत गटाचे कर्ज घेतले होते. ते परत भरण्याची मागणी केल्यानेच मंदा चोरट यांचा घातपात करून तो अपघात असल्याचा खोटा कांगावा करण्यात आला आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.वाई पोलिसांनी सुखदेव चोरट याला अटक केली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केलेली आहे. सध्या तपास सुरू असून, पोलिसांनी कोणतीही दिरंगाई अथवा चालढकल केलेली नाही.- रमेश गलांडे, पोलिस निरीक्षक
मंदा मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा
By admin | Updated: March 16, 2016 23:38 IST