चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार यांनी सहकाऱ्यांसमवेत करत महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदस्तरावर पाठपुरावा करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन पवार यांनी या वेळी दिले. चाफळसह परिसरात पहिल्या माॅन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावत हाहाकार माजवला होता. सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरुन भिंती कोसळल्या तर पेरणी केलेले उभे पीक वाहून जाऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. शेतीचे बांध फुटून अनेक गावांत रस्ते फरशीपूल खचून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. काही ठिकाणी डोंगर खचण्याच्याही घटना घडल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषद सदस्य राजेश पवार यांनी पाहणी केली. तसेच महसूल विभागाला बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी माजी गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पवार उपस्थित होते.