कुडाळ : जावळी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीचा जोरदार पाऊस पडत आहे. यातच तालुक्यातील मेढा-महाबळेश्वर मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे बुधवारी झालेल्या पावसाने मामुर्डीनजीक नवीन पुलाच्या बांधकामासाठी केलेला पर्यायी रस्त्याचा भराव वाहून गेला. यामुळे यामार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली होती.
सातारा-मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर सध्या पूल बांधण्याचे व रस्त्यांची कामे चालू आहेत. बुधवारी दुपारी पडलेल्या पावसाने परिसरातील ओढ्यानाल्यांना पाणी आले तर काही ठिकाणी रस्त्याला टाकलेले भरावही खचून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. मामुर्डी गावानजीक असणाऱ्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने पाण्याचा प्रवाह वाढला व पुलाचा भराव वाहून गेला. यामुळे केळघर-महाबळेश्वर रस्ता पूर्णपणे बंद झाला.
केळघरला जाण्यासाठी मेढामार्गे पर्यायी रस्ता म्हणून मोहाट, सावली अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. करंजे येथील पुलाजवळीलसुद्धा असाच रस्ता खचत चालला आहे. संबंधित ठेकेदाराने तत्काळ याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी लोकांमधून व्यक्त होत आहे.
०३कुडाळ
फोटो - मामुर्डी (ता. जावळी) येथे पुलाच्या बांधकामासाठी केलेला पर्यायी रस्त्याचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प होती.