सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम असून, गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ८ मिलिमीटरची नोंद झाली, तर प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक एकदम कमी झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरचे पर्जन्यमान पाच हजार मिलिमीटरच्या उंबरठ्यावर आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण पूर्णपणे विस्कळीत राहिले आहे. कारण, एकदम पाऊस पडणे व नंतर दडी अशीची स्थिती राहिलेली आहे. कारण, जुलै महिन्याच्या मध्यावर दमदार पाऊस कोसळला होता. पूर्व दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागांत तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले, तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रमुख धरणांतही पाण्याची आवक वेगाने झाली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्यात आले. कोयना धरणात तर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती, तसेच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून तुरळक पडत गेला. सद्य:स्थितीत पावसाची उघडीप आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे, तर पश्चिम भागातही उघडीप आहे. गुरुवाारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे अवघ्या एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर नवजाला ३ आणि महाबळेश्वरला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. असे असले तरी यावर्षी जूनपासून महाबळेश्वरला सर्वाधिक ४८२० मिलिमीटर पाऊस नोंद झालेला आहे. यानंतर नवजा येथे ४६८२ आणि कोयनानगर येथे जूनपासून आतापर्यंत ३५७२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊस पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडू शकतो.
चौकट :
धोम, कण्हेरमध्ये ८८ टक्क्यांवर पाणी...
जिल्ह्यात सध्या पावसाची उघडीप आहे. तरीही पश्चिम भागातील धरणांत चांगला पाणीसाठा झालेला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८८ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. कोयनेत ९० टक्के, उरमोडी धरणात ८५, बलकवडी ९२, तारळी धरणात ९० टक्क्यांवर पाणीसाठा झालेला आहे.
...............................................................