सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणाचे दरवाजे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा बंद करण्यात आले आहेत, तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. तसेच अजूनही प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे; पण जून महिन्याच्या मध्यानंतर खऱ्याअर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मागील दीड महिने पाऊस पडत आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला होता. पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरातच थोडाफार पाऊस झाला.
त्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात चांगला पाऊस पडला, तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयना आणि उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही दमदार हजेरी लावली. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने आणि मोठी वाढ झाली; पण चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तर धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ३२, नवजा ३७ आणि महाबळेश्वर येथे ३५ मिलिमीटर पर्जन्यमान झाल्याची नोंद आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणातील पाणीसाठा ८६.१९ टीएमसी झाला होता. धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची आवक आहे.
त्यातच पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळी ११ पासून दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सातारा शहरातही रिमझिम स्वरूपात पाऊस पडतोय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाला सुरुवात झाली होती.प्रमुख धरणांत १२५ टीएमसी पाणीसाठा..जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ३ हजार ५१, नवजा ३ हजार ३५६ आणि महाबळेश्वर येथे ३ हजार ४८६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे, तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास या धरणात १२५.५१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८४.३८ टक्के या धरणांत पाणीसाठा झालेला आहे.