सातारा : सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी गावावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे गावच्या सार्वजनिक विहिरीतील पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मात्र, एका ग्रामस्थाने स्वत:च्या कूपनलिकेचे पाणी विहिरीत सोडून गावचा पाण्याचा प्रश्न सोडवला. भीषण दुष्काळामुळे अवघा महाराष्ट्र होरपळून निघत आहे. कायम दुष्काळी भागात तर आठ-आठ दिवस पाण्याची वाट पाहावी लागत आहे. सातारा तालुक्यातील बसाप्पाचीवाडी हे एक खेडेगाव. गावची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास. बऱ्याच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या विहिरीच्या पाणीपुरवठा योजनेतून गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला होता. या विहिरीतील पाणी आजपर्यंत कधीही आटले नव्हते. याच काय पण, गावातील बहुतांश सर्वच विहिरींना वर्षभर पाणी असायचे. यंदा मात्र दुष्काळाने कहरच केला. गेल्या महिनाभरापासून गावच्या सार्वजनिक विहिरीतील पाणी आटू लागले आहे. गावातील इतर खासगी विहिरींचेही पाणी आटल्याने गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. हे संकट दूर करण्यासाठी गावातीलच गोरख विठ्ठल वाघमळे हे पुढे आले. वाघमळे यांनी त्यांच्या खासगी कूपनलिकेचे पाणी सार्वजनिक विहिरीत सोडले. यासाठी सुमारे ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनी टाकून बोअरचे पाणी विहिरीत सोडण्यात आले. हेच पाणी विहिरीतून पंपाद्वारे उचलून पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत सोडून पाणी वितरण व्यवस्थेद्वारे ग्रामस्थांना दिले जात आहे. वाघमळे यांनी दाखवलेल्या उदारपणामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. (प्रतिनिधी)
खासगी कूपनलिकेचे पाणी सार्वजनिक विहिरीत!
By admin | Updated: April 30, 2016 00:57 IST