लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे शेतकऱ्यांनी प्रचंड ट्रॅक्टर रॅली करून शक्ती प्रदर्शन केले. पोलिसांनी अनेक ठिकाणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिणामी काही ठिकाणी पोलीस, शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांचा झेंडा फडकवला. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून, त्यांनी जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांची माफी मागावी व तीनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी सीटूसह सर्व कामगार संघटनांनी केली आहे.
गेले दोन महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेने ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या अगोदर जून महिन्यापासून देशातील पाचशे शेतकरी संघटना या अध्यादेशाविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी हे तीन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे, परंतु मोदी सरकार हटवादीपणाने शेतकऱ्यांची मागणी मान्य करायला तयार नाही. देशाच्या शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये आजच्यासारखी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. हे केंद्र सरकारचे व पंतप्रधान मोदींचे मोठे अपयश आहे.
ज्यावेळेला शेतकरी आंदोलन करत होते, त्याची दखल पंतप्रधानांनी न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये यावे लागले. या परिस्थितीला खुद्द पंतप्रधानच जबाबदार आहेत. पंतप्रधानाच्या अहंकारी व हटवादी स्वभावामुळे व जनतेच्या इच्छा, आकांक्षांना लाथाडल्यामुळे आजच्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तरी पंतप्रधानांनी हटवादीपणा सोडावा आणि तिन्ही शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणीही ‘सिटू’कडून करण्यात आली आहे.