सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी १२ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छानणीत आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून भरलेला तसेच प्राची पाटील यांनी शिवसेनेकडून भरलेला प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला. ८ एप्रिल रोजी अर्ज माघारीनंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील, हे स्पष्ट होणार आहे.
उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील, प्राची नरेंद्र पाटील (शिवसेना), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), सहदेव ऐवळे (वंचित बहुजन आघाडी), आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), सागर भिसे, शैलेंद्र वीर, किशोर धुमाळ, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छानणीत दोन अर्ज बाद केले गेले.
राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी डमी म्हणून आ. शशिकांत शिंदे यांनी तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यासाठी डमी म्हणून डॉ. प्राची पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. तसेच शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्जही वैध ठरला असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्यावतीने भरण्यात आलेले डमी अर्ज बाद ठरविण्यात आले.