कऱ्हाड : महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या ताफ्यातील पोलिस जीपला सोमवारी सायंकाळी अपघात झाला. त्यामध्ये तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील तासवडे हद्दीत हा अपघात झाला.हवालदार एम. डी. जगताप, एस. डी. मातारी, जीपचालक एस. आर. शिंदे अशी जखमींची नावे आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यासाठी सातारा पोलिस दलाकडून वाहने पाठविण्यात येतात. सोमवारीही एक महत्त्वाची व्यक्ती पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणार होती. त्यासाठी पोलिस दलाची जीप (एमएच ११ एबी २०६) पाठविण्यात आली होती. साताऱ्याहून ही जीप कासेगावपर्यंत गेली. तेथून पुढे सांगली पोलिसांची जीप जाणार असल्याने सातारा पोलिसांची जीप तेथून पाठीमागे साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. संबंधित जीप तासवडे गावच्या हद्दीत आल्यावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे जीप नाल्यात पलटी झाली.अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थ व प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना जीपमधून बाहेर काढले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. काही वेळातच महामार्ग पोलिस, तळबीड पोलिस व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. अपघातग्रस्त जीप नाल्यातून बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. अपघाताची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.
बंदोबस्ताच्या पोलिस जीपला अपघात
By admin | Updated: August 2, 2016 01:00 IST