शिवथर : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून, १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी आचारसंहिता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शिवथर येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन सातारा तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना व ग्रामस्थांना आचारसंहितेचे पालन करण्याबाबत काही सूचना केल्या.
राज्यात तसेच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय हेवेदावे तसेच गावागावातील असणाऱ्या राजकीय गटतट यांच्यातील असणारी धुसफूस निवडणुकीवेळी दिसून येते. त्यासंदर्भात सातारा तालुका पोलीस स्टेशनतर्फे शिवथर येथे सर्वपक्षीय ग्रामपंचायत निवडणूक बैठक आयोजित करण्यात आली होती.
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी काही सूचना केल्या तसेच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्व पक्षांना विनंतीदेखील केली. तसेच निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मतदानावेळी काही गडबड गोंधळ झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी बीट अंमलदार लक्ष्मण जाधव, महिला पोलीस रेश्मा भोई, पो. कॉ. गदडे तसेच गावातील विविध पक्षांचे उमेदवार, अध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.