कऱ्हाड : येथील शहर पोलीस ठाण्यानजीकच्या गणेश लॉजमध्ये सुरू असलेला कुंटणखाना सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, लॉजचालक पसार झाला आहे. लॉजमधून मुंबईतील चार युवतींची पोलिसांनी सुटका केली आहे. विकी अजित शहा (वय २९, रा. मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड), साजिद मुनवर मुजावर (वय २६, रा. राजवाडा इचलकरंजी, सध्या रा. गणेश लॉज), अशोक शंकर मोरे (वय ४२, रा. हेळगाव, ता. कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर लॉजचालक अरुण बाबूराव चव्हाण (रा. शनिवार पेठ, कऱ्हाड) याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेश लॉजमध्ये कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री गुन्हे शाखेने सापळा रचला. लॉजवर पोहोचलेल्या पोलीस पथकाने लॉजची झडती घेतली असता, एका खोलीत चार युवतींना ठेवण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. संबंधित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर लॉजवरील विकी शहा, साजिद मुजावर व अशोक मोरे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यानजीकचा कुंटणखाना उद्ध्वस्त
By admin | Updated: May 15, 2015 23:34 IST