सातारा : जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर ‘ओपन बार’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर बुधवारीच अडगळीतील साहित्य अन्यत्र हलवून परिसर अगदी चकाचक केला, तर या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा घडून आली.
जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर ‘ओपन बार’ असे वृत्त बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. सर्वत्र ‘ओपन बार’चीच चर्चा सुरू झाली. यामुळे बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा घडून आली. सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी पहिल्या मजल्यावरील ओपन बारमध्ये आम्हालाही घेऊन जावा. तेथे कोणती-कोणती मिळतेय ते पाहू, असे बोलून विषय गांभीर्याने घेण्याबाबत स्पष्ट केले होते. यावर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी माहिती घेऊ, असे जाहीर केले होते. तर एकीकडे सभा सुरू असताना दुसरीकडे ओपन बारचा परिसर स्वच्छ करण्यात येत होता.
जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टसमोर हिरकणी कक्ष आहे. त्याच्या पश्चिम बाजूलाच अडगळीचे साहित्य टाकण्यात आले आहे. त्यातील आतील बाजूस मद्याच्या बाटल्या सतत आढळून येत असत. याच ठिकाणी अनेक खुर्च्या होत्या. त्या ठिकाणी बसून मद्यप्राशनाचा कार्यक्रम होत असल्याची चर्चा होती. आता या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. नको असलेले साहित्य दुसरीकडे हलविण्यात आले आहे. त्यामुळे आता तेथे कोणी बसले तर दिसून येणार नाही. परिणामी मद्यप्राशनाचा कार्यक्रम थांबवावा लागणार आहे.
दरम्यान, ‘ओपन बार’चे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
फोटो दि.०२सातारा झेडपी स्वच्छता फोटो...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे परिसर चकाचक झाला आहे. (छाया : नितीन काळेल)
............................................................