मलकापूर : कराड परिसरात वाघ दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली होती. याची दखल घेऊन वनविभागाने केलेल्या तपासणीत ‘एआय’च्या साह्याने वाघाचे फोटो तयार करून व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले. खोटे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, यासाठी सायबर क्राइम ब्रँचला पत्र दिल्याची माहिती कराडचे वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी दिली.वन अधिकारी ललिता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड येथील मुजावर कॉलनी परिसरात वाघोबा अवतरल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती मिळताच तातडीने दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कसून तपासणी केली.कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करून ओमकार बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याने कराड शहरामधील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याच्या अफवा गुरुवार, दि. २९ रोजी विविध प्रकारच्या सोशल मीडियावर विशेषतः व्हाॅट्सॲप या प्रसार माध्यमाद्वारे पसरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला ही गंभीर बाब आहे.प्राप्त झालेल्या भ्रमणध्वनी संदेशान्वये संबंधित ठिकाणी जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्या परिसरात वाघाचा वावर असल्याचे दिसून आलेले नाही. तो फोटो व व्हिडीओ तांत्रिक विश्लेषणासाठी पोलिस उपनिरीक्षक सायबर क्राइम विभाग कराड यांच्याकडे पाठविले आहेत, असेही वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. ही कार्यवाही सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मलकापूर वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अक्षय पाटील, अभिजीत शेळके यांच्यासह आरआरटी टीमचे अजय महाडिक, रोहित कुलकर्णी यांनी केली.
सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दिसले नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीने वाघास समक्ष पाहिले असल्याचे स्पष्ट झालेले नाही, तरी परिसरातील सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. - ललिता पाटील, वनक्षेत्रपाल, कराड
Web Summary : AI-generated tiger photos caused panic in Karad. Forest department investigation revealed the hoax. Police complaint filed against those spreading false images to cyber crime branch.
Web Summary : एआई-जनित बाघ की तस्वीरों से कराड में दहशत फैल गई। वन विभाग की जांच में धोखा सामने आया। झूठी तस्वीरें फैलाने वालों के खिलाफ साइबर अपराध शाखा में पुलिस शिकायत दर्ज।