वाठार निंबाळकर : धुमाळवाडी (ता. फलटण) येथील फळबाग शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेची रक्कम मिळविण्यासाठी फलटण तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या कार्यालयात निवेदने दिली.
धुमाळवाडी, गिरवी, निरगुडी, बोडकेवाडी, सासकल या गावांसह फलटण तालुक्यातील गिरवी मंडलातील सर्व गावांमधील फळबाग शेतकऱ्यांनी या हंगामातील पिकांचा पीकविमा मिळावा, यासाठी कोट्यवधीची पीकविमा रक्कम हवामान आधारित फळबाग पीकविमा योजनेमध्ये भरलेली आहे. तालुक्यात नुकताच अवकाळी पाऊस पडल्याने फळबागांचे नुकसान झालेले आहे. पीकविमा कंपनीने नको ते वाढीव नियम व निकष न लावता तातडीने फळबाग शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन फळबाग शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येईल, असा इशारा प्रगतशील शेतकरी समीर पवार व इतर शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला आहे.
नीळकंठ धुमाळ म्हणाले, ‘आमच्या गावातील शेकडो फळबाग शेतकऱ्यांनी लाखोंची पीकविमा रक्कम विमा कंपनीकडे बँकेच्या माध्यमातून जमा केलेली असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने बागांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज काढून बागा लावलेल्या आहेत. विमा न मिळाल्यास अनेकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. तरी तातडीने विमा रक्कम मिळावी, अन्यथा आत्मदहन करू.