पाचुपतेवाडीत सुमारे २० वर्षांपूर्वी नळयोजना कार्यन्वित केली असून, योजनेची विहीर वांग नदीच्या काठावर तर ६५ हजार लिटरची पाण्याची टाकी गावाजवळच्या टेकडीवर आहे. अनेक वर्षांपासून वाढलेली झुडपे, झाडांच्या फांद्या यामुळे नदीकाठावरील विहीर त्यात दिसेनाशी झाली होती. बंधाऱ्यामुळे नदीत साठून राहणारे तसेच ओढे व नाल्यातून नदीपात्रात येणारे दूषित व गाळमिश्रित पाणी विहिरीला नदीच्या बाजूस पडलेल्या छिद्रातून विहिरीत घुसत होते. त्याच पाण्याचा पिण्यास वापर केला जात असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला होता. दूषित पाण्यामुळे अनेकांना त्रासही होत होता. या पार्श्वभूमीवर सरपंच आत्माराम पाचुपते यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील युवक, ग्रामस्थ यांनी प्रतिसाद देत तीन दिवस श्रमदान करीत झुडुपे व फांद्याच्या वेढ्यात गुदमरलेला विहिरीचा श्वास मोकळा केला. जेथून नदीतील पाणी विहिरीत घुसत होते ती भगदाडेही त्यांनी मुजवली. आणि पाण्याच्या टाकीत साचून राहिलेला गाळही हटवून स्वछता केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमांचे पालन करत हे श्रमदान केल्याचे सरपंच पाचुपते यांनी सांगितले. उपसरपंच स्वाती जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
फोटो: २१केआरडी०१
कॅप्शन : पाचुपतेवाडी, ता. पाटण येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून स्वच्छता करीत आरोग्याचा प्रश्न निकाली काढला.