लोकमत न्यूज नेटवर्क
मसूर : शेतामध्ये बहरात आलेल्या पिकांचे वन्यप्राणी, पाखरं, गुराढोरांपासून संरक्षण व्हावे, यासाठी पूर्वी शेतकरी शेतामध्ये बुजगावणे उभे करत; परंतु काळाच्या ओघात या बुजगावण्यांचेही रूपडे पालटले असून, पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असल्याने बुजगावणे दुर्मीळ झाले आहे.
बुजगावणे म्हणजे शेतातील आले, हायब्रीड, भुईमूग आदी पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या युक्तीनुसार केलेली मानवाची प्रतिकृती होय. या बुजगावण्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून पक्ष्यांना, जंगली प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी केला जायचा. शेतात उभे असलेले बुजगावणे पाहून प्राण्यांचा व पक्ष्यांचा असा समज व्हायचा की शेतात कोणीतरी व्यक्ती उभी आहे म्हणून ते पिकामध्ये घुसण्याचे धाडस करत नसत. परिणामी पिके नुकसानीपासून वाचत असत. बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये काठीच्या साह्याने अधिक चिन्ह तयार करून त्यावर शर्ट अडकवला जातो व वरच्या टोकाला छोटे मडके अडकवले जाते व त्यावर ओल्या चुन्याने डोळे, नाक व तोंड रंगवले जाऊन मानवसदृश्य तयार केलेले बुजगावणे पिकाच्या मध्यभागी उभे केले जात असे.
अनेक शेतकरी पक्षी, प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पट्ट्या शेतात बांधत आहेत. तर काही ठिकाणी खतांची रिकामी पोती काठीवर उभी करून अडकवत आहेत. तसेच काही ठिकाणी कॅसेटमधील रिळ काढून ती हायब्रीडच्या कणसांवर बांधली जात आहे, ही रिळ वारा आल्यावर जोरजोराने वाजते. त्यामुळे पाखरांपासून पिकांचे रक्षण केले जात आहे, तर काही ठिकाणी वाऱ्याने घंटा वाजेल, असे जुगाड केले जात आहे. काही शेतकरी वन्य प्राण्यांपासून शेताचे, शेतीमधील पिकांचे कायमस्वरूपी संरक्षण व्हावे, यासाठी आपल्या शेतीच्या चहूबाजूला तारेचे कंपाउंड करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूर्वी सर्रास शेतामध्ये दिसत असलेली बुजगावणी दुर्मीळ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.
चौकट...
जणू माणूस उभा असल्याचा भास...
पूर्वी शेतकरी शेतातील पिके फस्त करणारे व नासधूस करणारे प्राणी, पक्षी, गुरेढोरांना घाबरवून हाकलून लावणे, या उद्देशाने अशी बुजगावणी करत व ती ठिकठिकाणी पाहायला मिळत असत; मात्र काळाच्या ओघात बुजगावणे दुर्मीळ झाले असले तरी त्यांचा ट्रेंड बदललेला दिसून येत आहे. या काठीच्या बुजगावण्यांना पॅन्ट, शर्ट घालून वरच्या टोकाला मडके अडकवून त्याला रंगवून जणू खरोखरचा माणूसच उभा आहे, अशी प्रतिकृती पाहायला मिळत आहे.
२७मसूर
फोटो कॅप्शन- माळवाडी, ता. कऱ्हाड येथील शेतात पँट, शर्ट घालून तयार केलेली वेगवेगळी बुजगावणी रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.