साताऱ्यामध्ये एका चहाच्या टपरीवर मित्रमंडळी जमली होती. चहा पीत-पीत त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होत्या. बाजूलाच एक साठी ओलांडलेले काका त्यांच्या गमतीजमती ऐकत होते. एक जण म्हणाला आमच्याच गल्लीतली कुत्री कोणाला गल्लीत येऊ देत नाहीत. फिरस्ता माणूस दिसला तर भुकायला सुरुवात करतात, तर दुसरा मित्र म्हणाला, अरे, तुझं सोड आमच्या आळीतले कुत्रे केवळ भुंकत नाहीत तर डायरेक्ट अटॅक करतात. रस्त्याला लावलेल्या चारचाकी गाडीच्या खाली बसलेली ही कुत्री अचानकपणे हल्ला करतात. तिसरा मित्र म्हणाला, अरे, आमच्या गल्लीतली कुत्री मोठ्या माणसाकडे बघत पण नाहीत... पण लहान पोरं दिसली की हल्ला केलाच म्हणून समजा... या मित्रांचा संवाद ऐकून चहाचा घोट रिचवत बसलेले काका अचानकपणे उठले अन् म्हणाले, अरे, साताऱ्यात पाहुण्यांकडे यायचं होतं; पण आता इथूनच परत जातो, नाही तर तुमच्या गल्लीमधील कुत्री माझाच फडशा पाडायची...!
-सागर गुजर