कुकुडवाड : ‘तालुक्यात कुकुडवाड गावची मोठी लोकसंख्या असतानादेखील कोरोना संसर्ग रोखण्यात व रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कुकुडवाडमध्ये राबविलेल्या योजना अत्यंत प्रभावी असून, या पॅटर्नचा अवलंब तालुक्यातील इतर गावांनीही करावा,’ असे प्रतिपादन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले.
येथील संकल्प इंजिनिअरिंग संस्था, ग्रामपंचायत कुकुडवाड व ग्रामस्थांच्यावतीने विलगीकरण कक्षाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संकल्प संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, सरपंच संजय जाधव,डॉ. गजानन जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
कुकुडवाडसह परिसरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. संकल्प इंजिनिअरिंगच्या वतीने रुग्णांना बेड्स पुरवण्यात आले तर इतर सर्व सोयी कुकुडवाड ग्रामपंचायतमार्फत पुरवण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांच्या दैनंदिन तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे. सर्वजण विनामूल्य सेवा देणार आहेत. कुकुडवाड प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांच्याशी चर्चेदरम्यान प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी प्राथमिक माहिती घेत काही सूचनाही केल्या. उपकेंद्रातील आरोग्यसेवक व आरोग्य सेविका यांच्याकडून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन संशयितांच्या अँटिजेन टेस्ट तसेच सर्व्हे वाढवण्याच्या सूचना देत, आशा स्वयंसेविका करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी मंडलाधिकारी सानप, गावकामगार तलाठी खताळ, ग्रामविकास अधिकारी एस. एस. काळे तसेच माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव काटकर, तुषार कुलकर्णी, जनसहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान-मुलाणी, जयंत शेटे, कुकुडवाड ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
===Photopath===
050621\img-20210605-wa0024.jpg
===Caption===
कुकुडवाडपॅटर्न चा अवलंब तालुक्यातील इतर गावांनीही घ्यावा: उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी