फलटण : फलटण नगरपालिकेच्या कामात अडचणी निर्माण करायच्या आणि कामे हाणून पाडायची एवढेच काम गेली पाच वर्षे विरोधकांनी केले आहे. अनेक कामांविरोधात त्यांनी तक्रारी केल्या, पण एकाही तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. नगरपालिकेच्या कामांविरोधात तक्रार करणे एवढाच विरोधकांचा अव्याहत उद्योग आहे, अशी टीका फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
फलटण शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्षारोपण करून पालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाला प्रतिउत्तरादाखल रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
रघुनाथराजेंनी पत्रकात म्हटले आहे की, विरोधकांना फलटण शहराचा विकास हवा आहे या गोष्टीवरच आपल्याला विश्वास नाही. यांना केवळ स्वत:चा विकास करायचा आहे. तालुक्याच्या विकासात यांचे योगदान आपल्याला कुठेही दिसत आहे. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. परंतु या सर्व रस्त्यांची कामे मंजूर असून निवडणुकीपूर्वी ही कामे पूर्णदेखील होणार आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांत झाडे लावणे हे त्यांचे केवळ एक नाटक आहे, असा आरोपही रघुनाथराजे यांनी केला.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोरोना काळात लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. हे काम करत असताना नेते, पदाधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. काहींचे प्राणही गेले. परंतु, आम्ही मदतकार्य थांबविले नाही. बाजार समितीमार्फत संपूर्ण फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली होती. त्यावेळी ही झाडे लावणारी मंडळी कुठे होती?, असा सवालही रघुनाथराजे यांनी यावेळी उपस्थित केला.
आज तालुक्यातील आंदरूडपर्यंत पाणी नेऊन रामराजे यांनी तालुक्याचा भक्कम विकास केला आहे. ज्याप्रमाणे नीरा उजवा कालव्यातून पाणी वाहताना श्रीमंत मालोजीराजे यांचेच नाव घेतले जाते त्याचप्रमाणे धोम-बलकवडीच्या कॅनॉलमधील पाणी वाहिल्यानंतर रामराजेंचेच नाव कायम घेतले जाणार आहे. प्रत्येक वेळेला आम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांकडे दुर्लक्ष करत आलेलो आहोत; पण आता इथून पुढे त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशाराही रघुनाथराजे यांनी यावेळी दिला.