सातारा : सातारा जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून सर्वत्र परिचित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत यशवंत विचार जोपासणाऱ्या २५० ज्येष्ठ नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होण्याची संधी दिली आहे.
यंदाच्या निवडणुकीत तरुण व महिलांची संख्या जितकी लक्षणीय आहे, तितकीच ज्येष्ठांची संख्याही मोठी आहे. गावामध्ये रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा नसताना जे सरपंच होते, त्यांच्या कामाची पोहोच म्हणून अशा लोकांना अनेक गावांनी बिनविरोध निवडून दिले आहे. तसेच आरक्षण सोडत झाल्यानंतर त्यांना सरपंच करण्याचे उद्दिष्टही काही गावांनी ठेवलेले आहे.
नव्या-जुन्यांना सोबत घेऊन गाव विकासाची कास धरल्याचे पाहायला मिळत आहे. शाश्वत विकास करण्यासाठी तरुण पिढी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत आहेत. केवळ विकासाच्या नावाखाली गावे भकास करायची नाहीत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करायच्या आणि शेतीला असलेला जोडव्यवसाय करुन पुढे चालायचे, असेच प्रत्येकाने ठरवलेले आहे.
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती ८७८
निवडून आलेले सदस्य ७,२६६
विजयी ज्येष्ठ नागरिक २५०
चौकट...
ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन
ज्येष्ठांना राजकारणाचा अनुभव असतो, त्यासोबतच विकासाची दृष्टीदेखील असते. सर्वांचा विचार करुन ते निर्णय घेतात. आता बहुतांश गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भवने उभी राहिलेली पाहायला मिळतील.
कोट...
मी गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येत आहे. ५ वर्षे मी सरपंचदेखील होतो. या कालावधीत केलेल्या कामाची पोहोच म्हणून जनता उतारवयातही मला निवडून देत आहे.
- यशवंत महामुलकर, महामुलकरवाडी, ता. जावली
कोट...
गावात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा आम्ही कंदिलात अभ्यास केला. चार बुके शिकलो, त्याचा गावासाठी फायदा करुन दिला. गावात वीज आणली, आमच्यापरिने पक्के रस्ते तयार केले. पाण्याची टाकी बांधली हीच कामे शाश्वत ठरली आहेत.
- संजय पवार, यवतेश्वर, ता. सातारा
कोट..
गणेश मंडळ, नेहरु युवा मंडळाच्या माध्यमातून कामे केली. डेअरी व्यवसाय असल्याने लोकांशी संपर्क आहे. मंदिराचा जीर्णाेध्दार करण्याच्या कामासाठी प्रयत्न केले. पाणीपुरवठा, क्रीडांगण, तालीम, ग्रंथालय याची कामे करणार आहे. निवडणूक झाली आहे. आता राजकारण खेळत बसण्यापेक्षा गावचा विकास कसा होईल, याचाच विचार निवडून आलेल्या सदस्यांनी करावा.
- हणमंत कणसे, अंगापूर वंदन, ता. सातारा
फोटो नेम : 22संजय पवार, २२ यशवंत महामुलकर, 22हणमंत कणसे
18 विनर्स सिटीजनस इन ग्रामपंचायत