पाटण : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाती-जमाती प्रवर्गासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातपडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती जोडण्याची अट घातल्यामुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी जातपडताळणीसाठी कोल्हापूरची वारी केली. आता मात्र निवडून आलेल्या उमेदवारांनाच जातपडताळणी दाखला देण्यात येईल, असा निर्णय घेतल्यामुळे हजारो उमेदवारांचे कष्ट पाण्यात जाणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांसाठी विविध जाती-जमातींच्या प्रवर्गासाठी जे निवडणूक लढविणार आहेत. त्यांना कोल्हापूर येथील जातपडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती जोडल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरता येणार नाही, अशी अट लादल्यामुळे गेल्या वीस दिवसांमध्ये पाटण तालुक्यासहीत इतर जिल्ह्यातील हजारो इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर येथे जाऊन जातपडताळणी पावती मिळविली. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करता करता उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. आता मात्र निवडून आलेल्यांनाच जातपडताळणी दाखला देण्यात येईल, असा नियम केल्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडले आहेत.ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध जातींच्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दाखल्यांची मोठी डोकेदुखी निर्माण झाली. त्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्र, मुद्रांक विक्रेते आणि तहसीलदार व प्रांताधिकारी अशी प्रक्रिया पार पाडताना अनेकांना नाकीनऊ आले. महिलांना तर कोल्हापूरला जातपडताळणीसाठी जावे लागल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. त्यातच जाईल तिथे आर्थिक पिळवणूक सहन करावी लागली. शेवटी जातपडताळणी करण्यासाठी अर्ज केल्याची पावती मिळेपर्यंत प्रत्येकाचे हजार ते दोन हजार रुपये खर्च झाले. आता कोल्हापूरच्या जातपडताळणी केंद्राने जे ग्रामपंचायतीत निवडून येतील, अशांनाच दाखले दिले जातील, असा नियम काढला आहे. त्यामुळे जातपडताळणीसाठी अर्ज केलेल्या इतरांना दाखले मिळणार नाहीत. पैसा, वेळ व झालेला त्रास याची भरपाई कोण देणार? कोल्हापूर येथील केंद्रात जातपडताळणीची पावती देताना प्रत्येकी १०० रुपये घेतले गेले, मग सातारा जिल्ह्यातील हजारो उमेदवारांचे पैसे घेतले, त्याचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) जातपडताळणी केल्याशिवाय निवडणूक लढविता येणार नाही, अशी निवडणूक आयोगाने अट घातली. आता जातपडताळणी केली तर फक्त निवडून येणाऱ्यांनाच दाखले देणार, असा नियम काढला आहे. यास आमचा विरोध असून जातपडताळणी केलेल्या प्रत्येकाला दाखले द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू. - नानासो गुरव, माजी सभापती, पंचायत समिती, पाटण
निवडून आलात तरच जातपडताळणी दाखला
By admin | Updated: July 27, 2015 00:22 IST