एकीकडे आमदार हटाव, दुसरीकडे आमचं ठरलंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:21 AM2019-08-31T05:21:09+5:302019-08-31T05:21:20+5:30

सातारा जिल्ह्यातील चित्र : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची मूळ कार्यकर्त्यांनी केली गोची

On the one hand remove MLA and on the other we have decided | एकीकडे आमदार हटाव, दुसरीकडे आमचं ठरलंय

एकीकडे आमदार हटाव, दुसरीकडे आमचं ठरलंय

Next

दीपक शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे; पण जे भाजपमध्ये गेले आहेत, त्यांनाही सामावून घेण्यास मूळ भाजपचे कार्यकर्ते तयार नाहीत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये आल्यानंतर तर आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये येण्याअगोदरच त्यांना विरोध होत आहे. आयात उमेदवारांमुळे मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.


भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज मुलाखती होणार आहेत. त्यापूर्वीच भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी रान उठवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना विरोध करण्याचे काम मूळ भाजपमध्ये असलेले कार्यकर्ते करू लागले आहेत. आयात नेत्यांमुळे अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. या भावनेला वाट करून देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका आणि मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.


सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले. सुरुवातीला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले; पण याच मतदारसंघातील त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे दीपक पवार आणि शिवेंद्रराजेंवर असलेल्या नाराजीमुळे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले अमित कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आडून विरोध सुरू केला आहे. त्यांनी भाजप निष्ठावंतांचा मेळावा घेऊन पक्षातूनच शिवेंद्रसिंहराजेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आमदार हटाव... भाजप बचाव अशीच मोहीम सातारा विधानसभा मतदारसंघात सुरू केली आहे.


अशीच परिस्थिती माण-खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगत आणि काँग्रेसच्या आमदाराने भाजपचा खासदार निवडून आणल्याची किमया केल्याने जयकुमार गोरे लवकरच भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता आहे. त्यापूर्वीच या मतदारसंघातील भाजपचे जुने कार्यकर्ते माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी त्यांना विरोध केला आहे. तर भाजपसोबतच इतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आमचं ठरलंय... गोरेंना पराभूत करायचंच, असे ठरविले आहे. त्यामुळे मूळ निष्ठावंतांच्या भूमिकेमुळे आता आयात नेते अडचणीत आले आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या कानपिचक्यानंतर ते थांबतीलही; पण मनातून ते मदत करतील का नाही, अशी भीती नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना वाटतच राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणार आले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या भाजपमध्ये आले असले तरी गेली २५ वर्षे आम्ही त्यांना विरोध करत आहोत. मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा लगेच पक्षाच्या कामाला लागलो आणि आमदार हटाव ही भूमिका घेतली. आता लोकांना त्यांनाच मते द्या असे कसे सांगणार. लोक ते ऐकणार नाहीत. त्यामुळे नव्याने आलेल्या लोकांना पाच वर्षे पक्षासाठी काम करू द्या नंतर त्यांना पक्षात पद द्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
- दीपक पवार, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ

Web Title: On the one hand remove MLA and on the other we have decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.