प्रमोद सुकरे - कऱ्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत म्हणे ! कृष्णा विद्यापिठात त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे; पण यावेळी फडणवीस डॉक्टरांना पदवीदान करतानाच ‘कृष्णा’काठच्या राजकिय फडात सहकाराची नाडी तपासणार की, अतुल भोसले त्यांना सहकाराचं ‘आॅपरेशन’ इथून कसं करायचं, हे सूचित करणार? याबाबत साऱ्यांना उत्सुकता आहे.राज्यात सध्या भाजप - सेना युतीचं सरकार आहे; पण पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात युतीला अपेक्षित यश मिळविता आले नाही. पश्चिम महाराष्ट्र हा साखर सम्राटांचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि प्रामुख्याने हा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या हातात आहे. सहकार क्षेत्राच्या जोरावर इथले राजकारण हाताळले जाते. त्यामुळे भाजप सेनेला आता सहकारालाच हात घालणे गरजेचे वाटते.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविण्याचा भाजप सेनेने मनोदय बोलून दाखविला; पणं पहिल्याच परिक्षेत ते नापास झाले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं ती संधी पुन्हा भाजप नेत्यांना आयती चालून आलीय. युवा नेते डॉ. अतुल भोसले भाजपमध्ये गेल्याने कऱ्हाड तालुक्यात पक्षाची ताकद वाढायला मदत झाली आहे. येवू घातलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभं ठाकणार आहे. मुळातच दिवंगत जयवंतराव भोसले, डॉ. सुरेश भोसले यांनी प्रदिर्घ काळ कृष्णेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. आता पुन्हा कारखान्याची सत्ता ताब्यात घेण्यासाठी त्यांची साखर पेरणी सुरू आहे. कृष्णेचे कार्यक्षेत्र ४ तालुक्यात विखुरलेले आहे. त्यामध्ये कऱ्हाड, वाळवा, कडेगाव आणि शिराळा तालुक्याचा समावेश आहे. तेथे पूर्वीपासूनच भोसलेगट कार्यरत आहे. त्यात सर्वांधिक मतदार कऱ्हाड तालुक्यात असले तरी सांगली जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील मतदारांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे.वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चांगली ताकद आहे. शिराळा तालुक्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, कडेगाव तालुक्यातील भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या साऱ्यांची व्यवस्थीत मोट बांधली तर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा साखर कारखाना भाजपच्या ताब्यात येवू शकतो. त्याचा फायदा भविष्यातील राजकारणातही होवू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ‘कृष्णे’च्या डॉक्टरांना पदवी तर दिलीच जाईलच; पण सहकारातील कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीची नाडीही तपासली जाईल आणि याचं आॅपरेशन कसं यशस्वी करायचं, याचं नियोजनही होईल अशी चर्चा आहे.
निमित्त पदवीदान समारंभाचे; साखरपेरणी ‘कृष्णे’ची!
By admin | Updated: April 22, 2015 00:23 IST