वडूज : ‘ऑक्सिजन हवा असेल आणि निसर्ग तुमच्या फोटोमध्ये दिसावा यासाठी एक तर झाड लावूयात, उज्ज्वल भविष्याचे धोरण म्हणजे पर्यावरण’.पर्यावरण दिनी या आशयाचे मेसेज प्रयास सामाजिक संस्थेच्यावतीने सोशल मीडियावर फिरत आहेत. संस्थेने शेकडो वृक्षारोपण करण्याचा ध्यास बांधला आहे.
काही वर्षांपूर्वी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्थेच्यावतीने वडूज शहर आणि परिसरात लावलेल्या असंख्य झाडांनी परिसरात नंदनवन फुलले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार दि. ५ रोजी सकाळी सात पासून प्रदिर्घ काळ श्रमदान करून निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. मानवाने केलेल्या अनेक वटवृक्षांची कत्तल आता थांबविण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या परिसरामध्ये नानाविध देशी झाडांची रोपे लावून ती जगविण्यासाठी शासनाचे सर्व प्रकारचे नियम व अटी शर्तीचे पालन करून संस्थेने कार्यक्रम आयोजित केला आहे.
काही वर्षांपासून या संस्थेने वडूज पंचक्रोशीसह खटाव येथील पवई गणपती मंदिर परिसरात शेकडो वृक्षारोपण करून संगोपन देखील केल्याने या परिसरात वीस ते पंचवीस फुटी देशी झाडे डौलदारपणे उभी ठाकली आहेत. वडूज परिसरातील येरळा नदीकाठ अनेक विविध फुले, फळे व देशी झाडांनी बहरला असल्याचे दृश्य चित्र पाहावयास मिळत आहे.