फलटण : ‘फलटण शहरासह तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे लॉकडाऊन राहणार असून, याकाळात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे सेवा सुरु राहणार आहेत. तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
सध्या फलटणमध्ये सोशल मीडियावर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने चालू राहतील, असे मेसेज फिरत आहेत. हे मेसेज आपल्या म्हणजेच सातारा जिल्ह्यातील नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. यासोबतच सातारा जिल्ह्याच्या सीमा आज रात्रीपासून बंद वैगरेचे मेसेज फिरत आहेत. अशा अफवांवरही नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
फलटणमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जर गरज नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलात तर मास्क व सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा काटेकोरपणे अवलंब करा. फलटण तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी फलटण तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी केले आहे.