सातारा परिस्थितीची जाण आणि वास्तवाचे भान ठेवत काही तरी उत्तुंग करण्याच्या इच्छेने चार्टर्ड अकौंटंटची परीक्षा देणाऱ्या माधुरी राजेंद्र माळी हिने या परीक्षेत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे माधुरी ही वृत्तपत्रविक्रेते आणि सातारा वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी यांची कन्या आहे.
येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात बी. कॉमचे शिक्षण घेत असतानाच माधुरीने सी. ए. परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.चार्टर्ड अकौंटंट जीवन जगताप आणि शाम गिते यांच्याकडे ती सराव करत होती. रजनी क्लासेसचे राम कदम सर यांचेही तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल दैनिक लोकमत आणि वृत्तपत्रविक्रेते संघटनेचे सर्व पदाधिकारी, विविध मान्यवरांकडून तिचे कौतुक होत आहे.
चार्टर्ड अकौंटंटचा अभ्यासक्रम तसा अधिक अवघड असतो. मात्र, त्यासाठी खास वेळ काढून माधुरीने सराव सुरु ठेवला होता. अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या परीक्षेतील यशापासून विद्यार्थी लांब राहतात. मात्र, माधुरीने जिद्दीने स्थानिक चार्टर्ड अकौंटंट यांची मदत आणि ऑनलाईन क्लासचा आधार घेत हे यश मिळविले. आता एवढ्यावरच न थांबता तिला पुढे कायद्याचे शिक्षण घ्यायचे आहे. तिला इन्कम टँक्समध्ये अधिक रस असून त्या दृष्टीने तिने नियोजन सुरु केले आहे.