शिरवळ : माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ नायगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. याप्रसंगी शासनाच्या निषेधार्थ नायगाव ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शिरवळमध्ये कारवाईबद्दल शासनाचे आभार मानणारा फलक लावण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचे पडसाद नायगाव याठिकाणीही उमटले. बुधवारी ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध करत नायगाव येथे कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांनी काळ्या फिती लावून निषेध फेरी काढली. शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरपंच मनोज नेवसे, मनसे तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे, सीमा कांबळे, वैशाली नेवसे, स्वाती जमदाडे, निखिल झगडे, सुधीर नेवसे, शोभा नेवसे, माजी सभापती शुभांगी नेवसे, पांडुरंग नेवसे, धनंजय नेवसे, भास्कर नेवसे, अशोक नेवसे, भागुबाई नेवसे, माजी सरपंच राजेंद्र नेवसे, दादासाहेब नेवसे, तुषार देवडे, मारुती नेवसे, अभिजित नेवसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी विनंती केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात केला होता. (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अटकाव... नायगाव ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मनोज पवार हे आंदोलनस्थळी आले होते. मात्र, नायगाव ग्रामस्थांनी संबंधितांना अटकाव केला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनामध्ये भाजपचे व नायगाव ग्रामपंचायत सदस्य निखिल झगडे हेही सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला तर शिरवळ याठिकाणी असणाऱ्या चावडी चौकात अटकेच्या समर्थनार्थ शासनाचे आभार मानणारा फलक झळकला. शिरवळमधील हा फलक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे एकीकडे कडकडीत बंद तर दुसरीकडे शासनाचे आभार अशी स्थिती निर्माण झालेली दिसून आली. दिवसभर यासंबंधी चर्चा सुरू होती.
नायगावला निषेध; शिरवळात आभार
By admin | Updated: March 16, 2016 23:34 IST