रामापूर : ‘कोरोनाच्या प्रभावामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले. प्रादुर्भाव कमी वाटत असला तरी अजूनही धोका टळलेला नाही. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षेच्या उपाययोजनांंसह निर्बंधांचे पालन करून समाजाच्या आरोग्यमय जीवनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी केले.
येथील श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टच्या हनुमान सेवा मंडळाच्या वतीने साधेपणाने साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या हस्ते गणेशाचे विधीवत पूजन करून उभयतांच्या हस्ते आरती करण्यात आली. तात्या शेंडे यांनी पौरोहित्य केले. मंडळाची स्थापना १९५२ मध्ये करण्यात आली. भाविकांच्या सहकार्याने मंडळाने आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दीपक राऊत व महेश राऊत यांनी दिली. श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मोटे यांनी स्वागत केले. अमित बेडके यांनी आभार मानले.