रहिमतपूर : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच खासगी वैद्यकीय व्यावसायिक, नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, आदींनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे,’ असे मत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.
रहिमतपूर नगरपरिषदेमध्ये कोरोना संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, विरोधी पक्षनेते नीलेश माने, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने, तालुका आरोग्य अधिकारी जाधव, मंडलाधिकारी विनोद सावंत, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, तलाठी प्रशांत सदावर्ते उपस्थित होते.
ज्योती पाटील म्हणाल्या, ‘कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारांसाठी रुग्ण आल्यास वेळ वाया न घालविता त्याचा स्वॅप घेऊन उपचार सुरू करावा. पाठपुरावा करून बाधितांना होम आयसोलेशन करताना योग्य ते मार्गदर्शन करावे. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांबरोबर समन्वय ठेवावा. रहिमतपूर येथील घरोघरी सर्व्हे करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन पथके नेमून काम सुरू करावे. या पथकामध्ये शासकीय आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह खासगी वैद्यकीय व्यावसायिक, नगरपालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक व खासगी शाळेच्या शिक्षकांचाही समावेश करावा. प्रत्येक कुटुंबाला ऑक्सिमीटर खरेदीसाठी विनंती करा. वेळोवेळी ऑक्सिजनची पातळी तपासून संशयास्पद वाटल्यास तत्काळ रुग्णालयात तपासणी करून घेण्यास लोकांना प्रवृत्त करा. मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात करा.’
आनंदा कोरे, सुनील माने यांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. नीलेश माने यांच्यासह काही नगरसेवकांनी लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर ज्योती पाटील यांनी लसीचा पुरवठा वाढविण्यासाठी नियोजन करीत असल्याचे सांगितले.
फोटो जयदीप जाधव यांनी मेल केला आहे.
रहिमतपूर येथील नगरपालिकेत आयोजित बैठकीत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. (छाया : जयदीप जाधव)