लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेत शिरकाव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. भाजपकडेही आता नेत्यांची फौज तयारी झाली असल्याने या पक्षाचे जिल्ह्यात बळ वाढलेले आहे. हेच बळ सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरले असून, भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डावपेच आखले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, अशा नेत्यांची मोठी फौज आता भाजपमध्ये आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही फौज राष्ट्रवादीला शह देऊ शकते, हे लक्षात घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपल्या पक्षाचा शिरकाव करण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे.
तर दुसऱ्या बाजूला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या नेत्यांनी पुन्हा एकदा बळ घेत जिल्हा बँकेची मोहीम हाती घेतलेली आहे.
माण तालुक्यातून आमदार जयकुमार गोरे यांचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. या परिस्थितीत रामराजेंनी माण तालुक्यात पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एका पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी भाजपवर टीकास्र सोडले होते, तर सोसायट्यांचे ठराव देताना बँकेचा विचार करावा, असे आव्हानदेखील केले होते. आता जिल्हा बँकेचे माण तालुक्यातील ६०० सभासद अक्रियाशील ठरविल्याने त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. २ हजार ६३० सभासदांपैकी ६०० सभासद बाद ठरविले गेल्याने आमदार जयकुमार गोरेंना कोंडीत टाकण्यात आले आहे. यावरुन राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
खासदार उदयनराजे भोसले हेही जिल्हा बँकेत संचालक आहेत. मात्र अजून तरी ते शांत आहेत. त्यांच्या हालचाली एकदा सुरू झाल्या की जिल्हा बँकेच्या रणांगणात धुराळा उडणार आहे. तोपर्यंत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील शीतयुद्ध, शह-काटशहाचे राजकारण सुरूच राहणार आहे.
चौकट...
ठरावांचे राजकारण
सहकारी संस्थांवर ज्या त्या तालुक्यातील आमदारांचे वर्चस्व असते. आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यात माण तालुक्यातील सहकारी संस्था मोठ्या संख्येने आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सहकारी संस्थांचे ठराव लागतात. यापैकी बहुतांश ठराव हे ठराव आ. गोरे यांच्या बाजूने झाले असल्याने ठरावांचे राजकारण सुरू झालेले आहे.
चौकट..
नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली
काही दिवसांपूर्वी एकाच पक्षात असलेले नेते आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले आहेत. जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सोसायट्यांच्या ठरावावरून चांगलीच जुंपली आहे. दोघांचेही कार्यकर्ते धुसफुस करत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या वादामध्ये पक्षीय राजकारण स्पष्टपणे दिसते. आगामी निवडणुकांमध्येही हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेचा फोटो वापरावा