कोरेगाव / वाई : ‘राज्याचे बजेट वार्षिक सात हजार कोटींचे असताना राष्ट्रवादीने तब्बल ८० हजार कोटींचे सिंंचनाचे प्रकल्प सुरू केले. योग्य नियोजन नाही, पुनर्वसन आणि वन विभागाच्या जमिनीचे प्रश्न जैसे थे ठेवत, केवळ टेंडरसंस्कृती आणत ठेकेदारी जोपासली. दहा वर्षांत ७२ हजार कोटी सिंंचनावर राष्ट्रवादीने खर्च केले; मात्र एक टक्कादेखील सिंंचन वाढले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राष्ट्रवादीला मतपेटीतून जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कोरेगावात काँग्रेसचे उमेदवार अॅड. विजयराव कणसे, तर वाईत मदन भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित संभामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर घणाघाती हल्ला चढविला. दरम्यान, वाई येथील सभेत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. भाजपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, हे सांगता येत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करून ही निवडणूक लढवत आहेत. शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्यांनी शंभर रुपये तरी आणले आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.कोरेगावातील सभेत ते म्हणाले, ‘एकत्रित सरकार चालवत असताना राष्ट्रवादीने सरकारचा एकाएकी पाठिंंबा काढून घेतला. आम्हीदेखील स्वाभिमानी असल्याने तातडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यात १५ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आणण्याचे पाप राष्ट्रवादीने केले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याची सत्ता दिली आहे. एकप्रकारे भाजपला बळकट करण्याचे काम छुप्या आघाडीद्वारे राष्ट्रवादी करीत आहे. प्रादेशिक पक्ष हे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात. केंद्रात आणि राज्यात आघाडीद्वारे सत्ता मिळविली.आता भाजपची केंद्रात सत्ता असल्याने तेथे काय मिळते का? हे पाहण्यासाठी राष्ट्रवादीने हा खाटाटोप केला.’ ‘आज राज्यात सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. प्रत्येकाला आता आपली ताकद १५ तारखेला कळणार आहे. शिवछत्रपतींचा वारसा घेऊन काम करीत असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली आहे. हा पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत आहे. राष्ट्रवादीचा जन्म ज्यासाठी झाला होता, तो विषय आता संपला आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अचानकपणे तीस जागा वाढवून मागितल्या, आम्ही दहा जागा देण्यास तयारी दर्शविली होती; मात्र त्यांनी अचानकपणे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ही मागणी केली, ती मान्य होणार नसल्याचे आम्ही स्पष्टपणे सांगताच त्यांनी आघाडी तोडली,’ असेही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. ‘कोरेगावात पाच वर्षे बाहेरच्या उमेदवाराचा पाहुणचार केला, त्यांना आता जाऊ द्या,’ असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंंदे यांचे नाव न घेता टीका केली. दरम्यान, दोन्ही सभांना आ. आनंदराव पाटील, सुरेश कुऱ्हाडे, भीमराव पाटील, किरण बर्गे, अविनाश फाळके, शंकरराव गाढवे, नारायण पवार, बापूसाहेब शिंदे, गुरुदेव बरदाडे, नीलिमा भोसले, लक्ष्मीबाई कऱ्हाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त आतील पानावर)
राष्ट्रवादीत ठेकेदारी संस्कृती !
By admin | Updated: October 12, 2014 00:46 IST