सातारा : सोशल मीडियाच्या प्रवाहात तरुण पिढी पुस्तकांपासून दूर चालली आहे. या तरुणाईमध्ये पुस्तकांची आवड निर्माण करून वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, या उद्देशाने साताऱ्यात ‘जंगल बुक लायब्ररी’ सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सातारकरांना झाडा, वेलींच्या सानिध्यात वाचनाचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. ‘हिरवाई’च्या प्रा. संध्या चौगुले यांच्या कल्पनेतून हा अनोखा उपक्रम साकारला जात आहे.वाचनामुळे आपली बौद्धिक क्षमता समृद्ध होतेय, शिवाय ज्ञानातही भर पडते. परंतु धकाधकीच्या जीवनात व सोशल मीडियाच्या प्रवाहात अनेकांना वाचनासाठी सवड मिळत नाही. त्यामुळे वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी काहीतरी करावे, अशी कल्पना प्रा. संध्या चौगुले यांच्या मनात आली आणि यातूनच निसर्गाच्या सानिध्यात ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सहकाऱ्यांसह मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या या कल्पनेबाबत सकारात्मकता दर्शविली. यानंतर ग्रंथालय सुरू करण्याची मोहीम सुरू झाली.हे ग्रंथालय एका बंद खोलीत नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सदरबझार येथील ‘हिरवाई’त झाडा-वेलींच्या सानिध्यात हे ग्रंथालय सुरू करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात सुरू झालेल्या या गं्रथालयाला ‘जंगल बुक लायब्ररी’ असे नावही देण्यात आले आहे. ग्रंथालयाच्या उभारणीसाठी लागणाºया वस्तू, पुस्तके दान करण्याचे आवाहन सातारकरांना करण्यात आले होते.त्यानुसार अनेक वाचनप्रेमींनी आपल्याकडील पुस्तके या ग्रंथालयासाठी देऊ केली आहेत. कोणी बैठक व्यवस्थेसाठी टेबल, खुर्च्या, बेंच याचीही व्यवस्था केली आहे. दि. १ मे रोजी हे ग्रंथालय सातारकरांसाठी खुले होणार असून, सातारकरांना आता निसर्गाच्या सानिध्यात वाचनाचा आनंद लुटता येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.वृत्तपत्रांपासून ग्रंथांपर्यंत‘जंगल बुक लायब्ररी’त वृत्तपत्रांपासून ते ग्रंथापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. लहान मुलांनादेखील कविता, गोष्टीच्या पुस्तकांचा आस्वाद येथे घेता येणार आहे. पुढील टप्प्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया युवकांसाठी अत्यावश्यक पुस्तकांची उपलब्धता केली जाईल, अशी माहिती प्रा. संध्या चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
निसर्ग सानिध्यात ‘जंगल बुक लायब्ररी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:33 IST