सातारा : जिल्ह्यासह राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस अन् राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे आजपावेतो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अरेरावीची भाषा वापरावी अन् ती इतरांनी ऐकून घ्यावी, एवढेच घडत होते. मात्र, सत्तांतराची किमया सातारकर अनुभवू लागले आहेत. कोयनानगर येथील कंपनीच्या कामात ‘खो’ घालणाऱ्या पुढाऱ्यांना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चांगलाच दम भरला. पालकमंत्री शिवतारे यांच्या भाषेमुळे राष्ट्रवादीत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात अनेक प्रकल्प राबविलेले आहेत. त्यांची कामे सुरूच आहे. धरणातून नदीपात्रात सोडलेले पाणी उचलून पुन्हा धरणात सोडण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. वास्तविक पाहता हे काम एक वर्षांत होणे अपेक्षित होते. मात्र, चार वर्षे होऊनही ते अपूर्ण आहे. त्यामुळे याची किंमत दुपटीने वाढली आहे. काम रखडण्याचे कारणही तसेच आहे. कामाचा ठेका घेतलेली कंपनी कर्नाटकातील आहे. याठिकाणी ‘मनसे’ व राष्ट्रवादीशी संबंधित पुढारी अधूनमधून जाऊन संबंधित ठेकेदारांना धमकावण्याचे प्रकार करत असल्याची तक्रार पालकमंत्र्यांच्या कानावर आली. स्थानिकांना नोकरीत समावेश करुन घेण्याबरोबरच अनेक कारणांनी ड्रिलरला त्रास दिला जात होता. त्यामुळे सर्वच काम थांबत होते. ‘कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणी त्रास दिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. मग ते कोणत्याही पक्षाचे असतील तरी गय केली जाणार नाही,’ असे सज्जड दमच पालकमंत्री शिवतारे यांनी दिल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)पाच दिवसांपूर्वी झाली होती मारहाणकोयना येथील कंपनीतील ड्रिलरला पाच दिवसांपूर्वीच मारहाण झाली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी व मनसेशी संबंधित कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
‘शिवतारी’ शैलीने राष्ट्रवादी घायाळ
By admin | Updated: January 21, 2015 23:55 IST