सातारा/कऱ्हाड : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण असलेला रमजान जिल्ह्यात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त साताऱ्यातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी मुस्लीम बांधवांनी पावसासाठी सामुदायिक प्रार्थना केली.रमजान ईदच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सामाजिक संस्था, संघटनांतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि पावसासाठी ‘अल्लाह’ला साकडे घालण्यासाठी गुरुवारी शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. यावेळी जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथील ईदगाह मैदानावर उपस्थिती लावून मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, आमदार आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार आदींसह मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, आमदार आनंदराव पाटील यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी कऱ्हाडात मुस्लीम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाजपठण आयोजित करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पावसासाठी मुस्लीम बांधवांचे सामुदायिक नमाजपठण
By admin | Updated: July 8, 2016 01:07 IST