वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील देऊर-बिचुकले हा गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला रस्ता सध्या लोकसहभागातून व शासनाच्या सहकार्यातून सुरू आहे. मात्र आता या रस्त्यात मधोमध असलेले महावितरणचे पोल या रस्त्याला विघ्न ठरत आहेत, हे पोल महावितरणने काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी बिचुकले व देऊर ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
राज्य शासन उद्योग व अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत देऊर बिचुकले गावच्या २८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू झाले असून, या कामासाठी अंदाजे २ कोटी ७५ लाख ३८ हजार ८४४ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.
बिचुकले गावाकडून देऊरकडे सध्या हा रस्ता अंतिम टप्प्यात सुरू आहे. खडीकरण होऊन या रस्त्यावर डांबरीकरणाचा एक थर टाकण्यात आला आहे, असे असताना या रस्त्यावर काही ठिकाणी महावितरणचे पोल उभे आहेत. ते पोल रस्ता सुरू होण्यापूर्वी काढून टाकावेत, अशी मागणी बिचुकले व देऊर ग्रामपंचायतीने वेळोवेळी महावितरणकडे करूनही हे पोल अद्याप हटवण्यात आले नाहीत. ते पोल महावितरणने तत्काळ हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.